३ वर्षांचं ते छोटंसं लेकरू…
निरागस… निष्पाप…
अजून नीट बोलतही नव्हतं…
आईच्या कुशीत शांत बसलेलं…
कधी माझ्याकडे पाहायचं…
तर कधी आईच्या चेहऱ्याकडे…
पण त्या आईच्या चेहऱ्यावर मात्र शांतता नव्हती…
डोळ्यात काळजी होती…
रात्रभर रडून सुजलेल्या डोळ्यांत भीती होती…
आणि मनात एकच प्रश्न होता…
“डॉक्टर… माझं बाळ नक्की बरं होईल ना…?”
मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातून ते माझ्याकडे आले होते…
कुणीतरी त्यांना सांगितलं होतं…
“घोडेगावला जा…
तिथे तुम्हाला नक्कीच फरक पडेल …”
त्या आईने बाळाला घट्ट मिठीत घेतलं होतं…
जणू जगाच्या प्रत्येक वाईट नजरेपासून ती आपल्या लेकराला वाचवत होती…
बाळाच्या चेहऱ्यावर… हातावर…
छोटे छोटे पांढरे डाग दिसत होते…
पण त्या डागांपेक्षा मोठ्या जखमा
त्या आई-वडिलांच्या मनावर झाल्या होत्या…
आई बोलायला लागली…
आणि प्रत्येक शब्दागणिक तिचं मन तुटत असल्याचं जाणवत होतं…
“सर…
खूप डॉक्टर फिरलो…
खूप औषधं घेतली…
कोणी म्हणालं कॅल्शियम कमी आहे…
कोणी म्हणालं रक्त खराब आहे…
कोणी म्हणालं आयुष्यभर जाणार नाही…
आणि काही डॉक्टरांनी तर सरळ सांगितलं —
‘यावर काही इलाज नाही…’ ”
हे बोलताना तिचा आवाज भरून आला…
“डॉक्टर…
हे खरं आहे का…?
माझं बाळ आयुष्यभर असंच राहणार का…?
मोठं झाल्यावर लोक त्याला स्वीकारतील का…?
त्याचं भविष्य काय…?”
एका आईच्या मनात किती वादळं चालू असतील
याची कल्पनाही करणं कठीण आहे…
ती पुढे म्हणाली…
“सर…
या डागांपेक्षा लोकांचे शब्द जास्त जखम करतात…
पाहुणे घरी आले की मुलाकडे बघून कुजबुज करतात…
काहीजण थेट विचारतात —
‘हे वाढत जाणार नाही ना?’
‘कुणाच्या घरचं काही आहे का?’
‘लग्नात अडचण येईल…’
‘असं मूल बाहेर कमी घेऊन जा…’ ”
हे ऐकताना त्या आईचे अश्रू थांबत नव्हते…
ती म्हणाली…
“सर…
कधी कधी वाटतं…
आजारी माझं बाळ नाही…
तर समाजाची मानसिकता आजारी आहे…”
तो क्षण खूप वेदनादायक होता…
कारण त्या छोट्याशा बाळाला अजून काहीच कळत नव्हतं…
तो निरागसपणे खेळण्याशी खेळत होता…
हसत होता…
कधी आईचा चेहरा हाताने धरत होता…
पण आई-वडिलांच्या मनात मात्र हजारो प्रश्नांचा अंधार होता…
रात्री झोप लागत नव्हती…
गावात कुणी काही बोललं की मन तुटायचं…
नातेवाईकांचे प्रश्न म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखं व्हायचं…
काही लोक तर एवढंही म्हणाले होते —
“हे बाळ शाळेत गेल्यावर बाकी मुलं चिडवतील…”
“मोठं झाल्यावर समाज स्वीकारणार नाही…”
“काय उपयोग एवढ्या उपचारांचा…”
कल्पना करा…
३ वर्षांच्या निष्पाप बाळाबद्दल असे शब्द ऐकताना
त्या आई-वडिलांच्या हृदयावर काय बीतत असेल…?
खरं सांगायचं तर…
पांढरे डाग फक्त त्वचेवर नसतात…
ते अनेक घरांच्या आनंदावर उमटलेले डाग असतात…
हा आजार शरीराला जितका त्रास देतो
त्यापेक्षा कितीतरी जास्त मानसिक वेदना देतो…
विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत
आई-वडील आतून पूर्णपणे तुटून जातात…
कारण त्यांना स्वतःच्या वेदनांची नाही…
तर लेकराच्या भविष्यातील वेदनांची भीती वाटत असते…
समाज आजही पांढऱ्या डागांकडे चुकीच्या नजरेने पाहतो…
कोणी संसर्ग समजतात…
कोणी पाप समजतात…
कोणी अपशकून समजतात…
पण सत्य काय आहे…?
पांढरे डाग हा संसर्गजन्य आजार नाही…
तो कुणाच्या स्पर्शाने पसरत नाही…
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे —
पांढरे डाग आले म्हणजे माणूस कमी होत नाही…
त्या बाळालाही इतर मुलांसारखंच प्रेम हवं आहे…
आधार हवा आहे…
स्वीकार हवा आहे…
उपचार करताना मी त्या आईला फक्त औषध दिलं नाही…
तर तिला धीर दिला…
मी शांतपणे तिला म्हणालो…
“वाहिनी …
आशा सोडू नका…
तुमच्या बाळाला तुमच्या विश्वासाची गरज आहे…
उपचार सुरू ठेवू…
पण सर्वात आधी स्वतःला मजबूत ठेवा…”
हे ऐकताच ती आई रडू लागली…
कदाचित अनेक महिन्यांनंतर
पहिल्यांदाच कुणीतरी तिला आशेचा शब्द दिला होता…
त्या क्षणी मला पुन्हा जाणवलं…
डॉक्टरचं काम फक्त औषध देणं नसतं…
कधी कधी तुटलेल्या मनांना आधार देणंही तितकंच महत्त्वाचं असतं…
आजही त्या छोट्याशा बाळाचे निरागस डोळे आठवतात…
आणि मनात एकच विचार येतो —
आजारी ते मूल नव्हतं…
आजारी होती समाजाची विचारसरणी…
चला…
पांढऱ्या डागांविषयीचे गैरसमज दूर करूया…
अशा रुग्णांना तिरस्कार नाही…
तर प्रेम, आधार आणि आत्मविश्वास देऊया…
कारण…
एका छोट्याशा लेकराला
आपल्या शब्दांनी आयुष्यभरासाठी जखमीही करता येतं…
आणि त्याच शब्दांनी पुन्हा जगण्याची आशाही देता येते…

No comments:
Post a Comment